पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता, शहराला चारही प्रमुख महामार्गांशी जोडणारा तब्बल ४५ किलोमीटर लांबीचा ‘ट्विन टनेल’ भूमिगत रस्ता उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि पुणे–मुंबई द्रुतगती मार्गांना एका साखळीप्रमाणे जोडणारी ही योजना साकार झाली, तर वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार कंपनीने सर्वेक्षण पूर्ण करून प्रारूप आराखडा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर केला आहे. सहापदरी असलेला हा भूमिगत मार्ग तीन टप्प्यांत उभारण्याचा प्रस्ताव असून शहराच्या विविध भागांना जोडणारे तीन महत्त्वाचे कनेक्शन यात सुचविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत कात्रज–येरवडा मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ‘ट्विन टनेल’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनांनुसार पीएमआरडीएने निविदा मागवून व्यवहार्यता तपासणीसाठी नियुक्ती केली होती. तीन कंपन्यांमधून निवड झालेल्या कंपनीने सादर केलेल्या आराखड्यात या प्रकल्पाचा विस्तृत अभ्यास प्रतिबिंबित होतो.
आराखड्यात काय?
महापालिकेच्या विकास आराखड्यात तळजाई आणि वेताळ टेकडीखाली भूमिगत रस्त्यांचा समावेश आहे. प्रारूप आराखड्यातही या दोन्ही मार्गांचा विचार करण्यात आला असून ते या ४५ किलोमीटरच्या रस्त्याचा भाग ठरणार आहेत. स्वारगेट, जगताप डेअरी आणि कात्रज येथे बोगद्याच्या प्रवेश,निर्गम बिंदूंचा समावेश करण्यात आला आहे.
या मार्गामुळे येरवडा, कॅन्टोनमेंट, सेनापती बापट रस्ता, कोथरूड, कात्रज तसेच मध्य पुण्यातील वाहतूक कोंडीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.
सुमारे ४५ किलोमीटरचे प्रमुख पर्याय
• येरवडा – खडीमशिन चौक
• शिवाजीनगर – येरवडा
• जगताप डेअरी – कोथरूड
महत्त्वाचे मुद्दे
• चारही महामार्गांना जोडणारा ४५ किमीचा भूमिगत रस्ता
• भूमिगत मेट्रो प्रकल्पांना बाधा न होईल, याची विशेष काळजी
• जमिनीखाली सुमारे ३० मीटर खोलीवरून मार्ग
• सहापदरी रस्ता; तीन टप्प्यांत उभारणी प्रस्तावित
• प्राथमिक अंदाजानुसार २०–२२ हजार कोटी रुपयांचा खर्च
• काही तांत्रिक बदल अंतिम आराखड्यात होण्याची शक्यता
• पीएमआरडीएकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार
हा प्रकल्प प्रत्यक्षात येणे म्हणजे पुणेकरांसाठी वाहतुकीतील एक मोठा श्वास, आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.


