पुणे प्रतिनिधी
न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा सभापती यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने ॲड. असीम सरोदे यांची वकिली सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अखेर बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगित केला आहे. यामुळे सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात ॲड. सरोदे यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत प्रादेशिक बार कौन्सिलने सनद रद्द केली होती. मात्र, या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप सरोदे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात ते बाजू मांडत असल्याने हा वाद अधिकच चिघळला होता.
सरोदे यांनी या शिक्षेविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे केलेल्या आव्हानावर सुनावणी घेत, “हे प्रकरण प्रत्यक्षात वकिली व्यवसायातील गैरवर्तनाशी संबंधित आहे का, याबाबत सखोल चौकशी आवश्यक होती,” असे निरीक्षण नोंदवत प्रादेशिक बार कौन्सिलच्या निर्णयावर स्थगिती दिली.
निर्णयानंतर समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना ॲड. सरोदे म्हणाले, “सत्याचा विजय होतो. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चा मी आभारी आहे. मी पुन्हा येतोय.”
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या हस्तक्षेपामुळे आता या प्रकरणाचा पुढील मार्ग कसा तयार होतो, याकडे कायदेवर्गाचे लक्ष लागले आहे.


