
पत्रकार :उमेश गायगवळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत स्नेहभोजन करणार असल्याचे सूत्राने माहिती दिली.
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. त्यामुळे याही वेळी नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या महायुतीच्या विजयाच्या वादळात विरोधी बाकावरील महाविकास आघाडीची पुरती वाताहात झाली. त्यानंतर सरकारच्या शपथविधीत पंतप्रधानांनी हजेरी लावली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांना नियोजित कार्यक्रमामुळे महायुतीच्या आमदारांना भेटता आले नव्हते. आता, मात्र, भाजपसह महायुतीचे मंत्री, आमदारांना पंतप्रधान भेटणार आहेत. त्यामुळे आमदार मंत्री महोदयाचे मनोबल वाढणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून स्नेहभोजन…
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहे. भाजपचे सर्व मंत्री -आमदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्नेहभोजन घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप महायुती सरकारच्या मंत्री आणि आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी होणार आहे. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्रीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेव्ही डॉकयार्डच्या कॅंम्पसमध्ये मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि आमदारांसोबत पीएम मोदींच स्हेहभोजन पार पडणार असल्याची माहिती आहे.
येत्या दोन तिन महिन्यातच मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील प्रलंबित खटले निकाली निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, राज्यात सगळ्याच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे मिनी विधानसभेत घवघवीत यश मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. मुंबईसह, ठाणे, पुणे आणि इतर महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली जाऊ शकते. त्यादृष्टीने पीएम मोदी यांचा दौरा हा महत्त्वाचा समजला जात आहे.