मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीने मुंबईच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. ठाकरेंची सेना, शिंदे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या अनेक माजी नगरसेवकांना आरक्षणामुळे मोठा धक्का बसलाय. अनेक प्रभाग महिला किंवा आरक्षित वर्गांसाठी राखीव ठरल्यानं दिग्गजांना आपापली राजकीय गणितं नव्याने मांडावी लागणार आहेत.
पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार महिलांसाठी तब्बल 50 टक्के म्हणजेच 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक अनुभवी आणि माजी नगरसेवकांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी पर्यायी वॉर्ड शोधावे लागणार आहेत.
राजकीय पातळीवर या निर्णयाने नव्या उमेदवारांसाठी दारे खुली झाली असली तरी जुने दिग्गज ‘राजकीय वनवासात’ जाण्याच्या भीतीने अस्वस्थ झाले आहेत.
मविआ आणि महायुतीतील दिग्गजांना बसलेला धक्का
आरक्षण सोडतीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांतील अनेक जेष्ठ नगरसेवकांच्या प्रभागांवर आरक्षण लागू झालं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची फेरजुळवाजुळव करावी लागणार आहे.
• ठाकरेंच्या सेनेला बसलेला फटका
तेजस्विनी घोसाळकर – प्रभाग 1 – ओबीसी महिला आरक्षित
सदा परब – प्रभाग 88 – सर्वसाधारण महिला आरक्षित
हाजी मोहम्मद हलीम खान – प्रभाग 96 – सर्वसाधारण महिला आरक्षित
रमेश कोरगावकर – प्रभाग 114 – सर्वसाधारण महिला आरक्षित
सुरेश पाटील – प्रभाग 127 – सर्वसाधारण महिला आरक्षित
मिलिंद वैद्य – प्रभाग 182 – ओबीसी आरक्षित
वसंत नकाशे – प्रभाग 186 – एससी महिला आरक्षित
आशिष चेंबूरकर – प्रभाग 196 – सर्वसाधारण महिला आरक्षित
• शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का
चंद्रवती मोरे – प्रभाग 121 – एसटी महिला आरक्षित
परमेश्वर कदम – प्रभाग 133 – एससी महिला आरक्षित
अख्तर कुरेशी – प्रभाग 139 – सर्वसाधारण महिला आरक्षित
मंगेश सातमकर – प्रभाग 175 – सर्वसाधारण महिला आरक्षित
रवी राजा – प्रभाग 176 – ओबीसी महिला आरक्षित
यशवंत जाधव – प्रभाग 209 – सर्वसाधारण महिला आरक्षित
गीता सिंगण – प्रभाग 12 – ओबीसी महिला आरक्षित
उपेंद्र सावंत – प्रभाग 118 – एससी महिला आरक्षित
संतोष खरात – प्रभाग 195 – ओबीसी आरक्षित
• भाजपच्याही गणितावर पाणी
नील सोमय्या – प्रभाग 108 – ओबीसी महिला आरक्षित
अभिजीत सामंत – प्रभाग 84 – सर्वसाधारण महिला आरक्षित
ज्योती आळवणी – प्रभाग 85 – ओबीसी आरक्षित
मकरंद नार्वेकर – प्रभाग 227 – सर्वसाधारण महिला आरक्षित
अतुल शहा – प्रभाग 220 – सर्वसाधारण महिला आरक्षित
• महिला आरक्षणात वाढ – नवी समीकरणं
या आरक्षण सोडतीत महिलांना 50 टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळालं असून, अनेक महिला कार्यकर्त्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. मात्र, अनुभवी नगरसेवकांचे वार्ड आरक्षित झाल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
• आता पुढे काय?
आरक्षणानंतर आता प्रत्येक पक्षासमोर उमेदवारांच्या निवडीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अनेक वॉर्डांमध्ये नवीन चेहरे समोर येण्याची चिन्हं दिसत आहेत, तर काही दिग्गजांसाठी पक्षाने पर्यायी प्रभाग शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.
मुंबईच्या राजकारणात या आरक्षण सोडतीने एकप्रकारे “शहराच्या सत्तेचा चेहरामोहरा बदलणारा झटका” दिला असल्याचं मानलं जातं.


