मुंबई प्रतिनिधी
मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोबाईलवरील काही फोटो आणि चॅट मेसेजवरून झालेल्या वादानंतर एका १९ वर्षीय ट्रान्सजेंडर तरुणीने आत्महत्या केल्याचा आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या प्रियकराचाही जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार माहीम खाडी येथे घडला.
ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास माहीम खाडीजवळ घडली. दोघांची ओळख कलंदर अल्ताफ खान (वय २१) आणि इरशाद उर्फ झारा (वय १९, दोघेही रहिवासी वांद्रे लालमट्टी) अशी आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे प्रेमसंबंधात असून अलीकडेच त्यांनी भाड्याच्या खोलीत एकत्र राहायला सुरुवात केली होती.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, झाराला कलंदरच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलीचे फोटो आणि काही चॅट मेसेज आढळले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद स्कूटरवरून माहीमकडे जात असतानाही सुरूच होता. अखेरीस झाराने कलानगर जवळील पुलावरून उडी मारली .ती वारंवार स्वतःला मारत पाण्यात उडी मारली. हे पाहून कलंदरने तत्काळ शर्ट आणि चप्पल बाजूला ठेवून तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या शोधासाठी जवळपास दोन तासांहून अधिक काळ मोहिम राबवण्यात आली. मात्र, उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह सापडले नव्हते.
झाराच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, कलंदर वारंवार तिच्यावर हल्ला करत असे आणि झाराने यापूर्वी किमान तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहीम पोलिस तपास करत असून दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.


