पुणे प्रतिनिधी
शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा सवाल उभा राहिला आहे. बाजीराव रोडसारख्या मध्यवर्ती भागात भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मयंक खरारे असे मृत तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हत्येत कोयत्यासह ‘कुकरी’ या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. कोयता गँगनंतर आता शहरात कुकरी गँगची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगत आहे.
घटना नेमकी कशी घडली?
बाजीराव रोड परिसरात दुपारी सुमारे ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन संशयितांनी मयंकवर अचानक हल्ला चढवला. काही क्षणातच संशयितांनी कोयता आणि कुकरीने वार करत त्याचा खून केला. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.
माया टोळीचा गुन्हा?
या खुनामागे नव्याने सक्रिय झालेल्या माया टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी आरोपींची नावे असल्याचे सूत्रांकडून कळते. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
राजकीय प्रतिक्रिया
घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली.
“गेल्या तीन दिवसांत पुण्यात दोन खून झाले आहेत. कोंढव्यातील खून प्रकरण ताजे असतानाच आता शहराच्या मध्यवर्ती भागात हत्या झाली. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गृहखात्याने तातडीने कठोर पावले उचलावीत,” अशी मागणी सुळे यांनी केली.
सततच्या हत्यांच्या घटनांनी पुण्यातील नागरिकांमध्ये भयाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेला गुन्हेगारीवर लगाम घालण्याची मोठी कसोटी लागली आहे.


