
मुंबई प्रतिनिधी
फलटण येथील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील चौकशीत होत असलेल्या विलंबाविरोधात राज्यभरातील डॉक्टर संघटना आक्रमक बनल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज, ३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालयांमधील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये डॉक्टरांनी मेणबत्ती मोर्चा काढून निदर्शने केली. त्यानंतर मार्ड, अस्मि, एमएसआरडीए या संघटनांनी बाह्यरुग्ण विभागांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, मॅग्मो, आयएमए आणि एएमओ या संघटनांनी सर्व प्रशासकीय व ऑनलाइन बैठका बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी बाह्यरुग्ण सेवांवर पूर्ण बहिष्कार टाकण्यात येणार असून, १४ नोव्हेंबरपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पहिल्यांदाच सर्व संघटना एकत्र
महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच मार्ड, मॅग्मो, आयएमए, एमएसआरडीए, एएमओ, एमएसएमटीए आणि अस्मि या सर्व प्रमुख डॉक्टर संघटना एका मंचावर आल्या आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनांनी स्पष्ट केली आहे.
रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न
डॉक्टरांच्या संपाचे गांभीर्य लक्षात घेत शासकीय यंत्रणेकडून पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यरुग्ण विभाग व आपत्कालीन सेवांसाठी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया विस्कळीत होऊ नयेत यावर देखील विशेष भर देण्यात आला आहे.
“मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयांना बाह्यरुग्ण व आपत्कालीन विभाग सुरळीत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. तसेच, स्थिर रुग्णांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे”.
डॉक्टरांचे आंदोलन कायम राहिल्यास आज दुपारी अधिष्ठात्यांची आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात येणार आहे.


