
मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून धगधगत्या उन्हाला विराम देत पावसाने पुनरागमन केले असून अनेक ठिकाणी मुसळधार सरींची नोंद झाली आहे. शेतकरी वर्गासह सामान्य नागरिकांनाही यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आगामी कालावधीत आकाश ढगाळ राहणार असून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पावसामागचे कारण
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्येकडील वाऱ्यांत आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून राज्यात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून परतला असला तरी हवामानातील या अनिश्चिततेमुळे शेती आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार सरींसह जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे.
मुंबईचा अंदाज
सांताक्रूझ वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर शहरात अंशतः ते सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच बाहेर पडताना छत्री वा रेनकोटची सोय करूनच निघण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.


