नागपूर प्रतिनिधी
नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यालयात दिवाळी मिलन सोहळ्यात सादर करण्यात आलेल्या लावणीच्या कार्यक्रमाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांना नोटीस जारी केली असून, सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या बॅनरसमोर एका महिला कार्यकर्त्याने लावणी सादर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह दिसत असल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकाराची दखल घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात शहराध्यक्षांना नोटीस बजावली असून, संबंधित कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि जबाबदारीबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, लावणी सादर करणाऱ्या महिला कार्यकर्त्या शिल्पा शाहीद यांनी मात्र आपल्या कृतीचं समर्थन केलं आहे. “मी लावणी कलाकार असून अनेक ठिकाणी कार्यक्रम करते. पक्षाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात काही महिला पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर मी लावणी सादर केली. त्यात काहीही चुकीचं नव्हतं. काही पुरुष कार्यकर्त्यांनीदेखील नृत्य केलं होतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
या घटनेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी असताना राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठुमके लागल्याची टीका अनेकांनी केली आहे. “अजितदादांच्या पक्षात लावणीचे ठसे उमटले” अशा उपरोधिक प्रतिक्रिया देत नेटिझन्सनी पक्षावर निशाणा साधला आहे.
तटकरे यांच्याकडून शहराध्यक्षांकडे आलेल्या नोटीसीनंतर आता नागपूर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


