नांदेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने तहसिलदारांच्या गाडीची तोडफोड करत संतापाचा उद्रेक केल्याची घटना घडली. अतिवृष्टीग्रस्त असूनही शासनाच्या अनुदानाचा लाभ न मिळाल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचे समोर आले असले तरी, तहसिलदारांनी मात्र संबंधित शेतकऱ्याला अनुदानाची रक्कम आधीच मिळाल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ खानसोळे (वय ३४) हा शेतकरी तहसील कार्यालयात आला होता. कार्यालय परिसरातच उभी असलेल्या तहसिलदारांच्या अधिकृत वाहनाच्या काचा त्याने अचानक फोडल्या. त्यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी खानसोळे याला ताब्यात घेतले.
शेतकरी साईनाथ खानसोळे याने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक चौकशीत सांगितले की, “मी अतिवृष्टीग्रस्त आहे. शासनाकडून जाहीर केलेले अनुदान अजून मिळाले नाही. कोणीही आमचा वाली नाही. म्हणूनच संतापाच्या भरात गाडी फोडली,” असे त्याचे म्हणणे होते.
दरम्यान, या घटनेवर तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “साईनाथ खानसोळे यांच्या खात्यात यावर्षीचे अतिवृष्टी अनुदान म्हणून ६,२०० रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षीचे अनुदान देखील त्यांना प्राप्त झाले होते. त्यामुळे अनुदान न मिळाल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे.”
या घटनेनंतर पोलिसांनी खानसोळे याच्याविरुद्ध सरकारी मालमत्तेची तोडफोड आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तपास मुदखेड पोलिस करत आहेत.
घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.


