मुंबई प्रतिनिधी
लालबाग-कालाचौकी परिसरात भरदिवसा एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी किरण सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखत व धैर्य दाखवत पीडित तरुणीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेदरम्यान अनेक नागरिकांनी हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही जवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही. अशा परिस्थितीत किरण सूर्यवंशी यांनी जीवाची पर्वा न करता पुढे होत त्या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर हल्लेखोर तरुणाने स्वतःच्या गळ्यावरही सुरा चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला
या घटनेनंतर परळ-कालाचौकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि केलेल्या पराक्रमाची दखल घेत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या विभागप्रमुख व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिस कर्मचारी किरण सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार केला.
या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या धैर्याचे कौतुक करत, अशा संकटसमयी धैर्याने उभे राहणाऱ्या पोलिसांमुळेच समाजात विश्वास निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.


