मुंबई प्रतिनिधी
बोरिवलीत शनिवारी पहाटे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पबमध्ये झालेल्या ओळखीचं नातं एका क्षणात हिंसाचारात बदललं. मोबाईलवरून झालेल्या किरकोळ वादानंतर एका व्यावसायिकाने संतापाच्या भरात तरुणीला कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना डॉन बॉस्को शाळेजवळील फायर ब्रिगेड गेट परिसरात घडली.
या प्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय विनीत धिया या व्यावसायिकाला अटक केली आहे. तर पीडित तरुणी चांगनू हॅशसिंग (२८) ही गंभीर जखमी असून सध्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचाराधीन आहे.
काय घडलं नेमकं?
बोरिवलीतील एका पबमध्ये दोघांची ओळख झाली होती. पबमधून बाहेर पडल्यावर आरोपी विनीत धिया यांनी तिला घरी सोडण्याची ऑफर दिली. कारमध्ये बसल्यावर तरुणीला आलेल्या एका फोन कॉलवरून त्यांच्यात वाद झाला.
विनीतने संतापाच्या भरात तिचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल परत मिळवण्यासाठी चांगनू कारच्या बोनेटवर चढली. मात्र, आरोपीने गाडी सुसाट वेगाने चालवत तिला फरफटत नेले. त्यामुळे ती खाली पडून गंभीर जखमी झाली.
स्थानिक नेत्यांची तत्काळ मदत
घटनेची माहिती मिळताच गोराईचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी तातडीने बोरिवली पोलिसांना संपर्क साधला. निर्भया पथकाने घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांची तत्पर कारवाई
परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव आणि सहायक आयुक्त प्रकाश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांनी आरोपी विनीत धिया याला अटक केली.
“आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुसूदन नाईक यांनी दिली.


