
पत्रकार :उमेश गायगवळे
पुसेसावळी-मुंबई ही एसटी बससेवा गेली अठ्ठेचाळीस वर्षांपासुन अविरतपणे सुरु होती. परंतु, करोना काळापासून ही बससेवा बंद झाली. त्यामुळे पुसेसावळी तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने ती गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिक गावकर्यानी केली आहे.
प्रवाशांनी वारंवार मागणी करुनही एसटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. एसटी प्रशासनाने ही बससेवा तात्काळ सुरु करुन ग्रामीण प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवांशाकडुन होत आहे.
पुसेसावळीसह परिसरातील नागझरी गावातील लोकांच्या मागणीनुसार माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या आदेशाने ही बससेवा सुरु करण्यात आली होती. परंतु, गेल्या तीन वर्षापासुन ही बससेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत पुसेसावळीसह परिसरातील पंधरा ते वीस गावांतून मुंबईला जायला एकही एसटी बससेवा नाही. परिसरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणेला वास्तव्यास आहेत. एसटी अभावी चाकरमान्यांबरोबर जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, दिव्यांग प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
करोनापूर्वी परेल आगाराच्यावतीने पुसेसावळी ते मुंबई एसटी बस पुसेसावळी येथून दररोज सकाळी 8:30 वाजता व सायंकाळी 6:30 वाजता व मुंबई (परेल) येथून सकाळी 7 वाजता व रात्री 9:30 वाजता याप्रमाणे दिवसातून दोनवेळा सुरु होती. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून परेल आगाराकडुन ही एसटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी कराड अथवा सातारा,घाटमाथ्यावर(औंध) जाऊन किंवा खासगी वाहनाने जावे लागत आहे. यामध्ये खासगी वाहनचालक प्रवाशांकडून जादा रक्कम घेत आहेत.
यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या काही दिवसात यात्रा-जत्रांचा हंगाम,लग्नसराई सुरु होत असुन पूर्वीपासून सुरु असणाऱ्या कराड-बारामती, कराड-शिर्डी, कराड-औरंगाबाद,कराड-बीड,फलटण-कोल्हापूर, फलटण-इस्लामपूर, दहिवडी-पाटण, रत्नागिरी-गोंदवले,सातारा-सांगली, आजकोरेगाव-सांगली या लांब पल्याच्या तसेच नवीन सोलापूर, अक्कलकोट, तुळजापुर, तळेगाव(पुणे) बससेवा पुसेसावळी मार्गे सुरु करण्याची मागणी प्रवांशाकडुन होत असून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.