
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी पार्टीसाठी कर्मचाऱ्यांसाठी दारूची ऑर्डर देणे एका नामांकित चित्रपट निर्मिती कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन ऑर्डरच्या माध्यमातून या कंपनीच्या प्रशासकीय प्रमुखाला तब्बल ₹६.७५ लाखांचा गंडा बसल्याची घटना विलेपार्ले (पूर्व) येथे उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मिती कंपनीचे प्रशासकीय प्रमुख एम. एम. भावेश यांनी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता गुगलवरून एका वाईन शॉपचा संपर्क क्रमांक शोधला. त्यानंतर त्यांनी सुमारे ₹९ लाख किमतीची दारूची ऑर्डर दिली. संपर्कावर असलेल्या अजय कुमार नावाच्या व्यक्तीने स्वतःला दुकानाचा व्यवस्थापक म्हणून ओळख दिली आणि ५० टक्के रक्कम आगाऊ भरण्याची अट घातली. त्याने इनव्हॉइस आणि टीआयएन क्रमांक पाठवला, जे पाहता सर्व काही अधिकृत असल्याचा भास निर्माण झाला.
भावेश यांनी त्यानुसार ₹२.२५ लाखाची रक्कम ट्रान्सफर केली. काही वेळानंतर दुसऱ्या व्यक्तीने फोन करून स्वतःला त्या वाईन शॉपचा जनरल मॅनेजर असल्याचे सांगितले. त्याने डिलिव्हरीपूर्वी संपूर्ण रक्कम भरण्याची मागणी केली. भावेश यांनी यास नकार दिल्यानंतर त्यांनी २५ टक्के रक्कम घेऊन उर्वरित डिलिव्हरीनंतर देण्याचे ठरवले. परंतु काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून ₹४.५० लाखांची अतिरिक्त रक्कम बेकायदेशीरपणे डेबिट झाल्याचे समोर आले.
दारूची ऑर्डर मात्र कधीच आली नाही. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर भावेश यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, “ऑनलाइन गुगल सर्चमधून मिळणारे क्रमांक अनेकदा फसवणुकीसाठी वापरले जातात. अशा प्रकरणांमध्ये व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी प्रत्यक्ष दुकान किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे.