
मुंबई:प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, दुसरीकडे मुंबईतील सुरक्षितेच्यादृष्टीने संवेदनशील असणाऱ्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. माता रमाबाई आंबेडकर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. हा गोळीबार लुटमारीतून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. अज्ञातांनी गोळीबार करत पीडित व्यापाऱ्याच्या हातातील बॅग पळवली. हल्लेखोराने ४ राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. या बॅगेत काही मौल्यवान वस्तू असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात पी डिमेलो मार्गाजवळ घडली.
हल्लेखोराने पीडित व्यक्तीच्या पायावर गोळी झाडली. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात (एमआरए) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआरए पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू आहे.