
मुंबई प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. घराघरांत साफसफाई, फराळ, कंदील, पणत्या यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र या दिवाळीत मुंबईकरांचा आनंद काहीसा फिका होणार असे दिसते. कारण, पुण्यानंतर आता मुंबईतही फटाक्यांबाबत कठोर निर्णय घेण्यात आला असून रस्त्यावर आणि पदपथांवर फटाके विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने विनापरवाना फटाके विक्रीवर ‘बॅन’ लावत विशेष मोहीम हाती घेतली आहे. १५ ऑक्टोबरपासून दिवाळी संपेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून दररोज तपासणीसह दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अवैध विक्रेत्यांचा माल जप्त केला जाणार असून भुयारी मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि बाजारपेठांमध्येही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी तब्बल २५० किलो फटाके जप्त करण्यात आले होते. यंदा अंधेरी, दादर, कुर्ला परिसरात सर्वाधिक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “फटाके विक्रीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील. अधिकृत विक्रेत्यांनीही अतिरिक्त साठा ठेऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल.”
दरम्यान, पुण्यातही फटाक्यांबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. मात्र, आवाज न करणारे फटाके, जसे फुलबाजी, अनार, यांना या वेळमर्यादेनंतर मुभा दिली आहे.
त्याशिवाय, ‘अॅटमबॉम्ब’ आणि १०० पेक्षा जास्त स्फोट असलेल्या साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरातील सायलेंट झोनमध्ये फटाके वाजवण्यासही मनाई आहे.
मुंबई आणि पुण्यात लागू झालेले हे निर्बंध पाहता, या वर्षीची दिवाळी थोडी शांत आणि प्रदूषणमुक्त ठरण्याची शक्यता आहे. मात्र फटाके फोडण्याची परंपरा जपणाऱ्या नागरिकांना मात्र यामुळे हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.