
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत बेस्ट बस म्हणजे सामान्य मुंबईकरांचा श्वास, पण हा श्वास आता गुदमरतोय. पश्चिम उपनगरातल्या अलीयावर जंग मार्गावर रोज संध्याकाळी बस प्रवासी अक्षरशः मृत्यूच्या दारी उभे केले जात आहेत! कारण बेस्टचे काही चालक बस थांब्याला न उभा करता, रस्त्याच्या मधोमध बस थांबवतात. मागून भरधाव मोटरसायकल येतात आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला जातो. आणि बेस्ट प्रशासन? झोपलंय की मुद्दाम दुर्लक्ष करतंय?
“बस थांब्याजवळ थांबवायला सांगावं लागतं का?”
खेरवाडी जंक्शन ते वाकोला, सांताक्रूज या मार्गावर संध्याकाळी सात ते नऊदरम्यान प्रचंड वाहतूक असते. या मार्गावरून सी ७२, ३४८, ४४०, ४०, ३७, ३९, ३५, ३२१ अशा अनेक बस धावत असतात. पण टीचर कॉलनी बस थांब्यावर न थांबता काही चालक मधेच बस थांबवतात. त्यामुळे प्रवाशांना उतरतानाच मोटरसायकल खाली सापडायची वेळ येते.
गेल्या आठवड्यात एका महिलेला बसमधून उतरतानाच मोटरसायकलने धडक दिली. जीव वाचला, पण जखमी झाली. आणि तरीही बेस्टच्या अधिकाऱ्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही! नागरिकांनी तक्रारी केल्या, पण प्रशासनाने कानांवर हात ठेवले आहेत.
“वाहतूक कोंडीचा बहाणा, जीवाशी खेळ!”
वाहतूक कोंडीचं कारण देत बसचालक मनमानी करतायत.
पण प्रश्न असा
“कोंडीचा रस्ता नागरिकांनी साफ करायचा का, की बेस्टने जबाबदारी घ्यायची?”
बस थांब्यावर बस उभी केल्यास प्रवाशांना उतरणं आणि चढणं सुरक्षित होईल, हे एवढं साधं समजून घेण्याइतकं प्रशासनाचं भान हरवलंय का?
“बेस्टचं ‘बे’ आणि प्रशासनाचं ‘स्ट’ गळून पडलंय!”
धारावी, राणी लक्ष्मी, दिंडोशी, बोरिवली, शिवडी आणि जे.एम. मेहता या डेपोतील अधिकाऱ्यांना ही परिस्थिती ठाऊक आहे. पण कोणीही आवाज उठवत नाही. दररोज हजारो प्रवाशांना रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालावा लागतो, आणि अधिकारी वातानुकूलित खोलीत बसून फाईल ढकलत बसलेत.
“बस थांब्यापासून रस्त्याच्या मध्यभागी थांबणाऱ्या चालकांना तत्काळ निलंबित करा!”
“रस्त्यावर उभं राहून प्रवाशांचा जीव घेऊ नका!”
अशी नागरिकांची मागणी आहे.
आता आंदोलनाचा इशारा
“एकाद्याचा जिव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थितांनी केला.
स्थानिक नागरिक मंगेश सांगळे, दिपक सुर्वे, महिला प्रवाशी संगीता माने रुपाली वेंगुर्लेकर आदी प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
“बस थांब्याच्या जवळ उभी केली नाही, तर आम्हीच बस थांबवू! आंदोलन होईल, जबाबदार प्रशासन राहील!”
बेस्ट प्रशासनानं आता तरी डोळे उघडावेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजी वृत्तीवर लगाम घालावा.
मुंबईकरांच्या नाडीत धावणारी बेस्ट आता त्यांच्याच जीवावर उठतेय आणि हे शहर ते पाहतंय.