
पुणे प्रतिनिधी
शहरात रस्त्यावरून होणाऱ्या वादातून हाणामारी आणि थेट शस्त्रांचा वापर करून हल्ल्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री विधी महाविद्यालय रस्त्यावर गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव अमोल काटकर असे असून ते गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनमध्ये कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काटकर हे सोमवारी मध्यरात्री ड्युटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली. विधी महाविद्यालय रस्त्यावरून जाताना दुचाकीला धक्का बसल्याच्या कारणावरून काटकर यांच्याशी दोन दुचाकीस्वारांची वादावादी झाली. वाद चिघळताच आरोपींनी अचानक कोयता काढून थेट काटकर यांच्या डोक्यावर वार केला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी कसाबसा ताबडतोब नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत काटकर यांना तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
वाढते हल्ले, पोलिसच लक्ष्य
पुण्यातील रस्त्यावरच्या किरकोळ कारणांवरून शस्त्रास्त्रांचा वापर करून हल्ले करण्याच्या घटना चिंताजनक पातळीवर पोहोचल्या आहेत. महिनाभरापूर्वी सेनापती बापट रस्त्यावर एका तरुणावर केवळ वाहन पुढे न दिल्याच्या कारणावरून कोयत्याने वार झाला होता. याशिवाय, भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगरमध्ये टोळक्याने कोयत्याच्या धाकावर दहशत माजवली होती.
विशेष म्हणजे, पोलिस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही आकडा लक्षणीय वाढला आहे. गेल्या दीड वर्षांत पुण्यातील विविध भागांत ३६ पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हडपसरमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला लाथ मारण्यात आली होती, तर पुणे स्टेशन परिसरात नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलिसाच्या अंगावर सरळ गाडी चढवण्यात आली होती.
या घटनांमुळे कायदा’सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “शहरात जेव्हा पोलिसच सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित होत आहे.