
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर : बावडा येथील शासकीय महिला वसतिगृहात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या छाप्यात सापडलेल्या सहा पीडित महिलांनी धारधार वस्तूने हातांच्या नस कापून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्व महिलांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना पुन्हा वसतिगृहात हलवण्यात आले असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले की, या घटनेनंतर वसतिगृहात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनाबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नसून, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाईचे कलम आता अस्तित्वात नसल्याने नोंद करण्यात आलेली नाही.२० ऑगस्ट रोजी कळंबा तर्फे ठाणे परिसरातील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री प्रकरण उघड केले होते. त्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या महिला जामिनासाठी प्रयत्न करत होत्या; मात्र त्यांचा अर्ज नाकारल्याने त्यांनी नैराश्याच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते.वसतिगृह प्रशासनाने स्पष्ट केले की, या घटनेचा वसतिगृह कर्मचाऱ्यांशी काहीही संबंध नाही. पीडित महिलांना केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवण्यात आले होते. “त्यांना लवकर मुक्त करण्यात यावे, अशी त्या महिलांची मागणी होती. ती गोष्ट व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे दिसते,” असे प्रशासनाचे म्हणणे आहे.