
कुडाळ प्रतिनिधी
दीड वर्षांची ओळख, त्यातून झालेली मैत्री, मैत्रीच्या जवळिकीवरून वाढलेली एकतर्फी भावना… पण प्रेमाला मात्र ठाम नकार. या नकाराने चिडलेल्या प्रियकराने “ती माझी नाही होणार, तर कुणाचीच होऊ देणार नाही” असा विकृत विचार करून तरुणीचा खून केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
कुडाळ तालुक्यातील घावनळे-वायंगणवाडी येथील दीक्षा तिमाजी बागवे (१७) ही २ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तब्बल ५८ दिवसांनंतर वाडोस येथील निर्जन भागात, डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगरात तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी दीक्षाचा परिचित असलेल्या कुणाल कृष्णा कुंभार (२२, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याला अटक केली असून, त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.
नेहमीप्रमाणे कॉलेजला, पण परतलीच नाही…
दीक्षा सावंतवाडीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २ ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे सकाळी घरून कॉलेजसाठी निघाली. मात्र दुपारी ती घरी परतलीच नाही. ३ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी कुडाळ पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दिली. दीक्षेच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल कुणाल कुंभारकडून आला असल्याचे तपासात आढळले. त्यामुळेच पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते.
कुणालवर चौकशीदरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रकार समोर आले. प्रत्येक वेळी तो वेगवेगळी माहिती देत होता. त्याच्या उत्तरांमधील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय गडद झाला. अखेर कठोर चौकशीत त्याने कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.
मैत्रीतून प्रेम, प्रेमातून विकृती…
कुणाल कुंभार हा आयटीआयचा विद्यार्थी आहे. दीक्षा व त्याची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यातून मैत्री झाली. मात्र मैत्रीचे प्रेमात रुपांतर करण्याचा त्याचा प्रयत्न दीक्षाने नाकारला. हा नकारच त्याच्या संतापाचे कारण ठरला. अखेर “ती माझी होणार नसेल तर कोणाचीच होऊ देणार नाही” या मानसिकतेतून त्याने निर्घृण कृत्य केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.