
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
रत्नागिरी : मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई केली आहे. दापोली तालुक्यातील केळशी आणि मंडणगड तालुक्यातील साखरी किनाऱ्यावर मिळून तब्बल ५.७२९ किलो वजनाचा, सुमारे २२ लाख ९२ हजार ४०० रुपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
१५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केळशी किनारा येथील अब्रार इस्माईल डायली (३२) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या पडवीतून जवळपास एक किलो वजनाचा, चार लाख रुपये किमतीचा चरस जप्त झाला.
या गुन्ह्याचा तपास पुढे सरकवल्यानंतर अब्रारला चरस अकिल अब्बास होडेकर (४९) याने पुरविल्याचे निष्पन्न झाले. अकिलची कसून चौकशी केली असता त्याने आणखी चार पिशव्या साखरी किनाऱ्यावर लपवून ठेवल्याचे कबूल केले. त्या पिशव्या जप्त करण्यात येऊन ४.७३१ किलो चरस मिळाला.
तपासादरम्यान ताबीस महमूद डायली (३०) यालाही अटक करण्यात आली असून ठाणे शहरातील शिळ डायघर पोलीस ठाण्यातील अमली पदार्थ गुन्ह्यातील मसुद बद्रुद्दीन ऐनरकर (२९) याचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाली असून चौथा आरोपी न्यायालयीन ताब्यात घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या मते, या गुन्ह्यात आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर व पथकातील पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक पाटील, स.पो.फौ/ गायकवाड, पो.हवा/ मोहिते, पो.हवा/ ढोले, पो.शि/ भांडे, पो.शि/ टेमकर, पो.शि/ दिंडे व म.पो.शि/ पाटेकर यांच्या सहकार्याने करण्यात आली.