
मुंबई प्रतिनिधी
आशिया चषक २०२५ स्पर्धा संपल्यानंतर झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व एसीसीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांना चांगलेच धारेवर धरले. भारताच्या विजयाबाबत नक्वी यांनी शुभेच्छा न दिल्याने बैठकीत बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी थेट आक्षेप नोंदवला आणि दबाव आणताच नक्वींनी अनिच्छेने भारताला अभिनंदन केलं. मात्र विजेतेपदाची ट्रॉफी सुपूर्द करण्याच्या मुद्द्यावरून तणाव अधिकच वाढला आहे.
३० सप्टेंबरला झालेल्या या बैठकीत भारताने अंतिम सामन्यानंतरच्या ट्रॉफी वादावर ठाम भूमिका घेतली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नक्वींना सवाल केला की, ट्रॉफी ही एसीसीची मालमत्ता आहे, ती वैयक्तिकरित्या कुणाकडेही राहू शकत नाही. तरीदेखील नक्वींनी ती आपल्या हॉटेलच्या खोलीत ठेवली असल्याचं शुक्लांनी स्पष्ट केलं. भारताला ट्रॉफी अधिकृत पद्धतीने सुपूर्द करणं आवश्यक असल्याचा आग्रह बीसीसीआयने धरला.
या वादाला उत्तर देताना नक्वी यांनी आपली बाजू मांडत सांगितलं की, भारतीय संघाने कुठेही लेखी स्वरूपात नमूद केलेलं नव्हतं की ते त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. मात्र बीसीसीआयचे प्रतिनिधी सातत्याने प्रश्न विचारत राहिल्यानंतरही नक्वींनी या चर्चेचा निर्णय पुढे ढकलण्याचं स्पष्ट केलं.
बैठकीदरम्यान भारताच्या विजयाबाबत नक्वींनी केलेल्या मौनावरूनही बीसीसीआय संतप्त झाले. अखेरीस आशिष शेलार यांनी दबाव आणल्यानंतर नक्वींनी भारताला शुभेच्छा दिल्या. पण ट्रॉफी सुपूर्द करण्याबाबत ते अजूनही टाळाटाळ करत आहेत.
बीसीसीआयने स्पष्ट केलं की, ट्रॉफी ही भारताचीच आहे आणि यावर कोणतीही चर्चा होणार नाही. आवश्यक असल्यास बीसीसीआय प्रतिनिधी एसीसीच्या कार्यालयातूनच ट्रॉफी घेऊन जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत तक्रार आयसीसीकडे दाखल करण्याची तयारीही बीसीसीआयने केली आहे.