
मुंबई प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, किरण मोरे, तसेच विद्यमान उपाध्यक्ष आणि कार्यवाहक अध्यक्ष राजीव शुक्ला यांची नावे शर्यतीत होती. मात्र, या सर्वांना मागे टाकत माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रविवारी (28 सप्टेंबर) मुंबईत झालेल्या 94व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (AGM) अधिकृत घोषणा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून मन्हास यांच्या निवडीची माहिती दिली. “मिथुन मन्हास बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहेत, त्यांचे हार्दिक अभिनंदन, असे त्यांनी म्हटले.
सभेत निवड समित्यांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले. माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांना पुरुष संघ निवड समितीत स्थान मिळाले. अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली असून, सुलक्षणा नाईक, जया शर्मा आणि स्रावंती नायडू यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ज्युनियर क्रिकेट समितीत एस. शरथ यांची नियुक्ती झाली.
मन्हास हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव मानले जाते. त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसले तरी रणजी आणि वयोगटानुसार क्रिकेटमध्ये अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. जम्मू-काश्मीर संघासाठी त्यांनी 15, 16 आणि 19 वर्षांखालील गटात प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, 1995 मध्ये त्यांनी तब्बल 750 धावा झळकावत विक्रम केला होता. त्यानंतर त्यांची उत्तर विभाग संघात निवड झाली आणि ज्युनियर स्तरावर त्यांनी चांगली छाप पाडली.
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे त्यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये संधी मिळाली. 2008 मध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल पदार्पण केले. त्यानंतर 2011 मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया आणि 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात ते सहभागी झाले. आयपीएलमधील 44 सामन्यांत त्यांनी 439 धावा केल्या आहेत.
भारतीय संघात स्थान न मिळूनही, देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी, रणजीतील दमदार फलंदाजी आणि आयपीएलमधील अनुभव या सर्वांच्या जोरावर अखेर मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची शर्यत जिंकली आहे.