
पुणे प्रतिनिधी
देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी संपर्क तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार असून, बीएसएनएलने स्वदेशी कंपन्यांच्या साहाय्याने विकसित केलेली ४ जी प्रणाली आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय या क्षेत्रांत नवे अध्याय लिहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ४ जी सेवेला शनिवारी ओडिशातील झारगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. महाराष्ट्रात या सेवेचा शुभारंभ पुण्यातील येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शितोळे, बापूसाहेब पठारे, भीमराव तापकीर तसेच एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल व बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार मक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
या ४-जी सेवेच्या निर्मितीमुळे भारत हा पूर्णपणे स्वदेशी दूरसंचार प्रणाली विकसित करणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. राज्य शासनाने अकराशे सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला असून, ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेलाही याचा थेट लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
औद्योगिक क्रांतीनंतर देशासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर उंच झेप घेत आहे. बीएसएनएलच्या प्रयत्नांमुळे १८ वर्षांनी ही कंपनी नफ्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्वदेशी तंत्रज्ञानामुळे देशाची सुरक्षितता बळकट होईल. बीएसएनएलने अवघ्या २२ महिन्यांत ही ४ जी प्रणाली उभी केली आहे. यामुळे २५ हजारांहून अधिक गावांचा विकास साधला जाणार आहे,असे मत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.