
मुंबई प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून देशात नवी जीएसटी प्रणाली लागू झाली असून, ग्राहकांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरला आहे. आता फक्त दोनच कर स्लॅब ५% आणि १८% अस्तित्वात राहणार असून जवळपास ९० टक्के दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशाला संबोधित करताना सांगितले की, ३७५ हून अधिक वस्तूंवर कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे घरे, टीव्ही, रेफ्रिजरेटर, बाईक, स्कूटर तसेच प्रवासाचाही खर्च कमी होणार आहे.
नवीन जीएसटी स्लॅब काय?
दैनंदिन वापराच्या आणि अन्नधान्याच्या बहुतांश वस्तूंवर करमुक्त किंवा ५% कर
पूर्वी १२% कर असलेल्या ९९% वस्तूंवर आता ५% कर
लक्झरी वस्तूंवर ४०% कर कायम
ग्राहकांना फायदा कसा होईल?
सरकारने स्पष्ट केले आहे की दुकानदारांनी जुना स्टॉक विकतानाही कमी जीएसटी दराचा फायदा ग्राहकांना द्यावा लागेल. मात्र, वस्तूंवर नवे स्टिकर लावणे बंधनकारक नाही. ग्राहकांनी मात्र खरेदी करताना नेहमीच बिल घ्यावे आणि त्यावरील जीएसटी दर तपासावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
जर दुकानदारांनी दर कमी केले नाहीत तर?
* जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचला नाही, तर तक्रार करण्यासाठी सरकारने स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
* राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन : १८००-११-४००० किंवा १४४०४
* ऑनलाइन तक्रार पोर्टल : www.ingram.gov.in
* GST तक्रार” कॅटेगरी निवडा
* दुकानाचे नाव, पत्ता, खरेदीचा तपशील द्या
* शक्य असल्यास बिल किंवा फोटो अपलोड करा
ग्राहकांनी काय करावे?
* खरेदीचे बिल घ्यावे
* बिलावरील मूळ किंमत व जीएसटी दर तपासावा
* दुकानदाराला थेट विचारावे की किंमत जीएसटी कपातीनंतरची आहे का?
* दर कमी न केल्यास त्वरित तक्रार दाखल करावी
सतर्क ग्राहकच सुरक्षित ग्राहक, सरकारने दरकपातीचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी पावले उचलली असली तरी खरेदीच्या वेळी जागरूक राहणे हे ग्राहकांचे कर्तव्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.