मुंबई प्रतिनिधी
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. २३) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने विविध विभागांतर्गत एकूण आठ महत्वाचे निर्णय घेतले. यात आरोग्य, परिवहन, महसूल, गृह आणि गृहनिर्माण विभागांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे शेतीतील नुकसानीसाठी मदतीपासून ते शहरी विकास आणि आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणापर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल ७० लाख एकर शेतीचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी १,३३९ कोटी रुपये तातडीने वितरित होणार असून पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
दुष्काळी दौऱ्याचे आदेश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना उद्यापासून (२४ सप्टेंबर) दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उद्या धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
• आठ महत्वाचे निर्णय
आरोग्य विभाग
शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेतून उपचारासाठी मिळणाऱ्या निधीच्या विनियोगास मंजुरी.
परिवहन विभाग
नागपूर–नागभीड १९६.१५ कि.मी. नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर.
या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद.
महसूल विभाग
अकोला येथे बस स्थानक, भाजी बाजार व वाणिज्य संकुलासाठी २४,५७९ चौ.मी. जागा महापालिकेला.
सोलापूर जिल्ह्यातील महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी घरांवरील मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.
वसई- विरार महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जमीन मंजूर.
महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिकरोड शाखेसाठी १०५५ चौ.मी. जागा मंजूर.
गृह विभाग
घाटकोपर येथील बेकायदेशीर फलक दुर्घटनेवरील चौकशी समितीचा अहवाल स्वीकारला.
समितीच्या शिफारशींवरील कार्यवाही एका महिन्यात करण्याचे आदेश.
गृहनिर्माण विभाग
मुंबईतील अंधेरी एसव्हीपी नगर येथे म्हाडामार्फत सामूहिक पुनर्विकास प्रकल्पास मंजुरी.
एकूण ४,९७३ घरांचा पुनर्विकास होणार.
या निर्णयांमुळे नागपूर, अकोला, सोलापूर आणि वसई- विरार या शहरांना मोठा फायदा होणार आहे, तसेच शेतकरी आणि रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे.


