
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुख्यात असलेल्या आणि नंतर राजकारणात प्रवेश केलेल्या अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेनं मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेना मैदानात उतरणार असून गवळींच्या कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली पक्ष उमेदवार उभे करणार आहे. विशेष म्हणजे अरुण गवळींच्या दोन्ही मुली, गीता गवळी आणि योगिता गवळी, यंदा निवडणुकीत उतरतील. गीता गवळी याआधी नगरसेविका राहिलेल्या असून योगिता गवळी ही पहिल्यांदाच राजकीय परीक्षेत उतरणार आहे.
गीता गवळी यांनी स्पष्ट केले की, शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेविका वंदना गवळी यांच्या विरोधातही पक्ष उमेदवार उभा करणार आहे. यापूर्वी अखिल भारतीय सेनेचे मुंबई महापालिकेत दोन नगरसेवक होते.
अरुण गवळी यांनी 1990 च्या दशकात वाढत्या पोलिस दबाव आणि अंडरवर्ल्डमधील संघर्षामुळे राजकारणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी 2004 मध्ये चिंचपोकळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना मकोका अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आणि ते मागील 18 वर्ष तुरुंगात होते. सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांची सुटका झाली.
गवळी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी, त्यांच्या पक्षाने मुंबई महापालिकेत पुन्हा आपलं स्थान मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.