मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयासह शहरातील सर्व न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी आल्याची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसर तत्काळ रिकामा करण्यात आला.

या ईमेलमध्ये केवळ मुंबई उच्च न्यायालयच नव्हे, तर किल्ला न्यायालय आणि वांद्रे न्यायालयासह सर्वच न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचे नमूद आहे. यानंतर बॉम्बशोधक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
दरम्यान, हा ईमेल कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे नेमका कोण आहे, याचा तपास पोलीस करत असून सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. न्यायालय परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.


