
ठाणे प्रतिनिधी
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. निषेधाच्या लाटेत ठाण्यातील आंदोलनावेळी पवार गटाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी थेट इशारा देत, “पडळकरांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल,” असे वक्तव्य केले.
देशमुख म्हणाले, “आम्ही कधीही अशा संस्कृतीचे पालन करत नाही. मात्र आता हद्द झाली आहे. जो तो बोलून जातो आणि आम्ही शांत राहतो ही भूमिका पुढे राहणार नाही. आता जशास तसे उत्तर दिले जाईल.
दरम्यान, पडळकरांच्या विधानाचा निषेध सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी झाला. इस्लामपूरमध्ये बंद पाळण्यात आला. तहसील कार्यालयावर पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत पडळकरांविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या छायाचित्रांना तुडवून रोष व्यक्त केला.
कोल्हापुरातील दसरा चौकातही निषेध आंदोलन झाले. या आंदोलनात विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. राज्यभर पडळकरांविरोधातील रोष चांगलाच पेटल्याचे चित्र दिसत आहे.