
नवी मुंबई प्रतिनिधी
सानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्नील लोहार (वय अंदाजे ३५) यांनी उलवा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोहार यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला असून त्यांना एक मुलगाही आहे. काही दिवसांपूर्वी पत्नी व मुलगा गावी गेले होते. त्यानंतर ते उलवा येथील घरात एकटे राहत होते.
बुधवार’मध्यरात्री लोहार यांनी पत्नीशी दूरध्वनीवर बोलताना आत्महत्येचा इशारा दिल्याचे समजते. पत्नीने ही बाब त्यांच्या सहकाऱ्याला कळवली. त्यानंतर उलवा पोलिसांनी तत्काळ लोहार यांच्या घरी जाऊन दरवाजा तोडला असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची नोंद उलवा पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.