
ठाणे प्रतिनिधी
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगरपालिकेतील एक मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार उघड झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाणे महापालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांना तब्बल २५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यापैकी १५ लाख रुपयांची रोकड त्यांच्या केबिनमध्ये सापडली.
अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. पाटोळे यांनी त्यांच्या प्रकल्पातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी २५ लाखांची लाच मागितली होती. यापैकी १० लाख रुपये आधीच स्वीकारल्यानंतर बुधवारी उर्वरित १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीने पाटोळेंना पकडले. ही कारवाई सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्या दालनात झाली.
कारवाईचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. घटनेनंतर महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पाटोळे यांचे नाव दोन दिवसांपूर्वीच एका माजी अधिकाऱ्याच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आले होते. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांच्याकडून लाच मागितल्याचा उल्लेख होता. याच रेकॉर्डिंगनंतर एसीबीने सापळा रचून पाटोळेंना पकडले.
शंकर पाटोळे हे ठाण्यातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे काम पाहत होते. त्यांच्या अटकेमुळे पालिकेतील इतर अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखील संशय निर्माण झाला असून पुढील चौकशीदरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.