
सांगली प्रतिनिधी
सांगली : कवठेमहांकाळ येथे डॉक्टरांच्या घरी मुंबई आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत छापा टाकून तब्बल एक कोटींचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा सांगली पोलिसांनी ६० तासांत पर्दाफाश केला. कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतून महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून, चौघे अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून ८५ लाखांचे दागिने व १५ लाख २० हजारांची रोकड असा एकूण एक कोटी २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील उपस्थित होते.
अटक करण्यात आलेल्यांत दीक्षा राष्ट्रपाल भोसे (२५, चिंचवड-पुणे), पार्थ महेश मोहिते (२५, कोल्हापूर), साई दीपक मोहिते (२३, पाचगाव-कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तर महेश शिंदे (जयसिंगपूर), अक्षय लोहार (संकेश्वर), शकील पटेल (गडहिंग्लज) व आदित्य मोरे (रुकडी) हे फरार आहेत.
डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या गुरुकृपा हॉस्पिटलवर १४ सप्टेंबरच्या रात्री हा बोगस छापा टाकण्यात आला होता. ‘आम्ही आयकर विभागातून आलो आहोत’, असा बनाव करून संशयितांनी मोबाईल काढून घेतले व घरातील एक किलो ४१० ग्रॅम दागिने आणि १५.६० लाख रुपये घेऊन पलायन केले. इतकेच नव्हे, तर संशय निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी डॉ. म्हेत्रे यांना इंग्रजीत लिहिलेली ‘जप्ती नोटीस’ही दिली होती.
तपासादरम्यान गावातील सीसीटीव्हीत आढळलेल्या एका कारच्या आधारे गुन्ह्याचा छडा लागला. सांगली पोलिसांनी राबवलेल्या सखोल तपासात पुण्यातील चिंचवडमधून दीक्षा भोसले, तर हातकणंगले येथून पार्थ आणि साई मोहिते यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. मात्र, मुख्य सूत्रधार महेश शिंदेसह चौघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कटाचा मास्टरमाईंड महेश शिंदे हा इंजिनिअर असून, यापूर्वी त्याच्यावर जुगाराचे दोन गुन्हे नोंद आहेत. पार्थ मोहिते खासगी बँकेत कार्यरत असून साई मोहितेचा इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय आहे. विमान कंपनीत कार्यरत असलेली दीक्षा भोसले पार्थची मैत्रीण असून, त्याच्या सांगण्यावरूनच ती या गुन्ह्यात सहभागी झाली. पोलिसांच्या मते, ‘स्पेशल २६’ आणि ‘रेड’सारख्या चित्रपटांचा प्रभाव या टोळीवर दिसून येतो.
सर्व आरोपी उच्चशिक्षित असून, गुन्ह्याची आखणी चित्रपटासारख्या पद्धतीने करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.