
सांगली प्रतिनिधी
राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून सांगली जिल्हा त्याला अपवाद ठरला नाही. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सलग दुसऱ्या दिवशी कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यातील तब्बल १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील विटा परिसरात ढवळेश्वर,कळंबी,भाळवणी मार्गावर ओढ्याला पूर येऊन गावांचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी घरे, दुकाने पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले. शेतात काम करणारे काही शेतकरी अडकून पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासन अलर्ट मोडवर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी जिल्ह्यातील स्थितीची पाहणी केली. काकडे यांनी पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले असून, शासकीय निकषांनुसार नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरात पाणी, नागरिक हैराण
सांगली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना हाल सोसावे लागले. ड्रेनेज लाईन तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचले. अखेर आयुक्त गांधी यांच्या सूचनेनंतर यंत्रणा रस्त्यावर उतरली आणि तातडीने गटारी, नाले साफ करण्यात आले. मात्र, या पावसामुळे नालेसफाई व अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून समाजमाध्यमांवर प्रशासनावर टीकेची झोड उठली.

कृष्णा आणि वारणा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणातून सध्या वीस हजार क्युसेक विसर्ग सुरू असून रविवारी तो ३० हजार क्युसेकपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी सांयकाळी कृष्णा नदीची पातळी सांगलीत १७ फुटांवर होती; पावसाच्या जोरामुळे ती २५ ते २८ फुटांवर जाऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.