
सांगली प्रतिनिधी
कृष्णा नदीपात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अवधूत अशोक वडार (रा. इस्लामपूर) यांचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कार्यरत होते. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात असला, तरी वडार यांच्या नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा संशय नोंदवला आहे.
शनिवारी सकाळी नवीन पुलाखाली एक मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला. तपासात मृत व्यक्ती जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता असल्याचे स्पष्ट झाले.
वडार यांना मागील सहा महिन्यांपासून एका आमदाराचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून सातत्याने त्रास दिला जात होता, असा नातेवाइकांचा गंभीर आरोप आहे. “ही आत्महत्या नसून घातपात आहे. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, सांगली शहर पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा सखोल छडा लावला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.