
मुंबई प्रतिनिधी
दादरमधील शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर मंगळवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सकाळी दहाच्या सुमारास पुतळ्यावर व पायथ्याशी लाल रंग पडलेला आढळला. ही माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गट) चे कार्यकर्ते घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले. कार्यकर्त्यांनी पुतळ्याची साफसफाई करून रंग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण राहिले.
या पार्श्वभूमीवर खासदार अनिल देसाई यांनी संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला. “समाजकंटकांनी केलेले हे कृत्य भ्याडपणाचे आहे. अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळते, कारण सरकार अपयशी ठरले आहे. पुतळ्यावर रंग फेकणारे संस्कारहीन आहेत. पोलिस तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
मीनाताई या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी. १९९५ साली त्यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान मानला जातो.
सध्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.