
मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने राज्यातील जनतेसाठी एक मोठी मोहिम जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ‘सेवा पंधरवडा २०२५’ राबवण्यात येणार असून, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा विविध अंगांनी उपक्रमांची लाट उसळणार आहे. पुढील पंधरवडाभर दररोज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो लोकांना थेट सहभागी करून घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
या उपक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, डोळ्यांचे व इतर उपचार, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा व मॅरेथॉन, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन मोहिमा, चित्रकला स्पर्धा, ‘वोकल फॉर लोकल’ प्रचार मोहीम, खादी वस्तूंचे प्रदर्शन व खरेदी प्रोत्साहन असे अनेक उपक्रम एकाच वेळी राबवले जाणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या सेवाचळवळीचा उद्देश केवळ सामाजिक कार्य नाही, तर शासनाच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. ५० लाखांहून अधिक लोकांना या अभियानाचा थेट लाभ मिळावा, असे आमचे लक्ष्य आहे.”
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खासदार चषक क्रीडा स्पर्धा, प्रतिमा पूजन कार्यक्रम, प्रबुद्ध संमेलने व जागरूकता मोहिमा आयोजित होणार आहेत. यातून पक्षाचे सर्व खासदार, आमदार, मंत्री व कार्यकर्ते बूथ व मंडळ स्तरावर जनतेशी संवाद साधतील.
चव्हाण पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. सेवा, लोकसंपर्क आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर आमचे अभियान आधारित आहे. ‘सेवा हेच ध्येय’ हा आमचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून आत्मसात करावा, हे या अभियानाचे मूळ उद्दिष्ट आहे.”
दरम्यान, भाजपकडून स्पष्ट करण्यात आले की आरोग्यसेवा व रक्तदानापुरते हे अभियान मर्यादित नसून, युवकांना खेळांच्या माध्यमातून एकत्र आणणे, समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच स्थानिक उत्पादक व कारागिरांना खादी व ‘वोकल फॉर लोकल’च्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे या सर्व अंगांनी याचा विस्तार होणार आहे.
राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमांची आखणी सुरू झाली असून, सेवा पंधरवडा खऱ्या अर्थाने एक ‘जनचळवळ’ ठरण्याची चिन्हे आहेत.