
मुंबई प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून त्यामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत नवीन २३९९ उपचारांना मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या हृदय, फुफ्फुस, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह नऊ गंभीर उपचारांसाठी स्वतंत्र कॉर्पस फंड निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ प्रत्यक्ष उपस्थित होते. तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तालुकानिहाय रुग्णालयांचे मॅपिंग करण्याचे निर्देश दिले. संबंधित तालुक्यात ३० खाटांचे रुग्णालय नसेल तर अन्य रुग्णालयांना योजनेत सामावून घ्यावे, तसेच खाजगी रुग्णालयांना सहभागी करून सुविधा द्याव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी, रुग्णालयांना वेळेवर देयके द्यावीत, तसेच जनतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित माहिती अॅप तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री शिरसाट व अदिती तटकरे यांनी आदिवासी भागासाठी निकषांमध्ये शिथिलता द्यावी आणि आधुनिक उपचारांचा समावेश योजनेत व्हावा, अशी मागणी केली.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
* महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत २३९९ उपचारांचा समावेश
* प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करता येणारे २५ उपचार योजनेत समाविष्ट
* ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सहभाग
* उपचारांच्या दर निश्चितीस मान्यता
* वैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यास मान्यता
* रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद; गुणवत्ता प्रमाणपत्र धारक रुग्णालयांना प्राधान्य
* आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अतिरिक्त रक्कम
* सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व नगरविकास विभागाच्या रुग्णालयांचा सहभाग वाढविण्यासाठी सूचना
* राज्यातील ४३८ उपचारांचे टीएमएस २.० प्रणालीशी सुसंगतीकरण
या निर्णयांमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अधिक व्यापक आणि प्रभावी होणार असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दर्जेदार उपचारांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.