
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत गेल्या काही तासापासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात आणि रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी पावसाचा येलो अलर्ट दिला असला तरी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथील वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे.#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 15, 2025
पावसामुळे मुंबई आणि ठाणे परिसरात लोकल ट्रेनला फटका बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनची वाहतूक संधगतीने सुरु असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे, तर हार्बर रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे. तर, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे.
मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर, कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, माटुंगा दादर दरम्यानही रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. जर असाच पाऊस सुरु राहिला तर लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डनर आणि दादरच्या हिंदमाता चौकात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. साचलेलं पाणी काढण्यासाठी पाणी उपसण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. तर, अंधरी सबवे येथे एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.