
सांगली प्रतिनिधी
विटा–बस्तवडे मार्गाच्या रुंदीकरणाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि महामार्ग बाधित शेतकरी आघाडीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोबदला आणि संपूर्ण नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय रुंदीकरणाचे काम सुरू करू देणार नाही, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
विटा–कवठेमहांकाळ महामार्ग व विटा–बस्तवडे रस्त्याचे काम निविदेनुसार ठेकेदाराने सुरू केले आहे. मात्र पाडळी, धामणी, हातनूर, मांजर्डे, बलगवडे, बस्तवडे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता रुंदीकरण सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जलवाहिन्या, विहिरी, फळझाडे, वनझाडे, घरांची बांधकामे यांचे नुकसान भरपाईशिवाय होत असल्याने शेतकऱ्यांनी काम थांबवले.
‘आधी मोबदला; मगच रुंदीकरण’, ‘२०१३ भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘जमीन आमच्या हक्काची, कुणाच्या बापाची नाही’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाधितांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन दडपशाहीने घेऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
रस्त्यालगतचे गट क्रमांक व सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र नोंदीत विसंगती असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. डांबरीकरणापर्यंतची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असून, ती जबरदस्तीने काढून घेणे बेकायदेशीर असल्याचा दावा मोर्चेकऱ्यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार व शेतकरी शिष्टमंडळ यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
मोर्चात शेकापचे दिगंबर कांबळे, बाबूराव लगारे, महादेव साळुंखे, पांडुरंग जाधव, जयंत मैदानकर, प्रसाद खराडे, गणेश मोहिते, भास्कर पाटील, बजरंग पाटील, दत्तात्रय पाटील, अशोक पाटील, संदीप कुलकर्णी, सोनाली मोहिते, सुरेखा मोहिते, उषा पाटील, विश्वनाथ पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.