
नवी दिल्ली, प्रतिनिधी
ईसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला (2025) केवळ अजून काही दिवस उरले आहेत. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच कोणत्याही आयसीसी स्पर्धेसाठी संपूर्ण महिला अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांचा पॅनेल घोषित करण्यात आला आहे.
या पॅनेलमध्ये एकूण 14 अंपायर व चार मॅच रेफरींचा समावेश असून, भारताच्या वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन या अंपायर म्हणून कार्य करणार आहेत. तसेच, जी. एस. लक्ष्मी यांची मॅच रेफरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मॅच रेफरी”ट्रुडी अँडरसन, शांद्रे फ्रिट्झ, जी. एस. लक्ष्मी, मिशेल पेरेइरा.
अंपायर” लॉरेन अजनबैग, कॅंडेस ला बोर्डे, किम कॉटन, साराह डंबनेवाना, शाथीरा जाकीर जेसी, कैरिन क्लास्टे, जनानी एन, निमाली पेरेरा, क्लैरी पोलोसाक, वृंदा राठी, सुई रेडफर्न, एलोइसे शेरिडन, गायत्री वेणुगोपालन, जॅकलीन विल्यम्स.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “महिला क्रिकेटच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. केवळ महिलांचा पॅनेल नियुक्त करून आयसीसीने जेंडर इक्वॅलिटीबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. या माध्यमातून खेळाबरोबरच ऑफिशियल्सच्या क्षेत्रातही महिलांना करिअर घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
महिला विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही घोषणा केवळ क्रिकेट विश्वासाठीच नव्हे, तर महिलांच्या क्रीडा प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.