
सांगली प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागातील एम.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगलीवाडी, सांगली) हिने आज दुपारी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहातील खोली क्रमांक ५४ मध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
रक्षाबंधनानिमित्त ८ ऑगस्टला घरी गेलेली गायत्री आज सकाळी वसतिगृहात परतली. “बाबा, मी सुखरूप पोहोचले” असा फोन तिने वडिलांना केला. पण अवघ्या काही तासांतच दुपारी दोनच्या सुमारास आत्महत्येची हृदयद्रावक बातमी कुटुंबाला मिळाली.
मैत्रिणींनी खिडकीतून पाहिले तेव्हा गायत्री पंख्याला लटकलेली दिसली. धक्क्याने त्यांनी हाका मारल्या, सुरक्षा रक्षकाला बोलावले आणि दरवाजा उघडला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह राजारामपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सरगर घटनास्थळी दाखल झाले.
गायत्रीच्या मृतदेहाला शेंडापार्क शवविच्छेदन कक्षात नेण्यात आले. मात्र, कुटुंबीयांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवला. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कळताच वडील, आई व बहिणींनी वसतिगृहात धाव घेतली आणि गायत्रीच्या मृत्यूची बातमी ऐकताच हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले.
विद्यापीठातील यापूर्वीचे प्रकार
शिवाजी विद्यापीठात यापूर्वीही आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने विष प्राशन करून, तर दुसऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तातडीच्या मदतीने त्यांचे प्राण वाचले. डिसेंबर २०१४ मध्ये मुलींच्या वसतिगृह क्रमांक ३ मध्ये सांगलीतीलच एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता पुन्हा सांगलीतीलच विद्यार्थिनीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.