
मुंबई-प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे तेरा हजार पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी मुंबईसह वाहतूक पोलिस बंदोबस्तकामी कार्यरत असतील. त्यात आठ अतिरिक्त आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी, १२ हजार ०४८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, एटीएस, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वर्षाच्या स्वागता दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉईंट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहिम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.सोबतच मद्यपान करून वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक, अंमली पदार्थांची विक्री व सेवन, तसेच अनधिकृत मद्य विक्री यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलली जाणार आहेत.मुंबई पोलीसांनी सर्व नागरिकांना नववर्ष जल्लोषात व सुरक्षित साजरे करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलाच्या या तयारीमुळे नववर्षाचे स्वागत आनंददायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.