
पॅरिस : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये उफाळलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्समध्येही हिंसाचाराची ठिणगी पेटली आहे. राजधानी पॅरिससह विविध शहरांत तणावाचं सावट पसरलं असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तब्बल ८० हजार पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत २०० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे.
सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, आंदोलन हिंसक वळणावर गेलं आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्रीचे प्रकार घडत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरतेचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांचं सरकार सोमवारी कोसळलं. विशेष म्हणजे गेल्या २० महिन्यांत चौथ्यांदा सरकार कोसळल्याची नोंद झाली आहे. परिणामी, लवकरच नव्या पंतप्रधानांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेपाळमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या छायेत आता फ्रान्समधील राजकीय व सामाजिक संकटही गंभीर वळण घेत आहे. देशातील परिस्थिती कुठपर्यंत चिघळते याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.