
वॉशिंग्टन : 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. नोबेल समितीनं जाहीर केलं की, “व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांसाठी आणि हुकूमशाहीविरोधात शांततामय संघर्ष केल्याबद्दल” मचाडो यांना हा सन्मान दिला गेला आहे.
५८ वर्षीय मचाडो सध्या भूमिगत आहेत. पुरस्काराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली “ओह माय गॉड… माझ्याकडे शब्द नाहीत. हा सन्मान माझा नाही, संपूर्ण समाजाचा आहे.”
नोबेल समितीचे अध्यक्ष योर्गेन वाटने फ्रीडनेस यांनी सांगितलं की, “लोकशाही धोक्यात असताना तिचं रक्षण करणं हेच शांततेचं खरं प्रतीक आहे.”
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला या पुरस्काराचे दावेदार घोषित केल्यानंतर समितीवर दबाव होता का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर फ्रीडनेस म्हणाले, “समिती नेहमीच उमेदवारांच्या कार्यावर आधारित निर्णय घेते, कोणत्याही दबावाचा परिणाम होत नाही.”
गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीवर बंदी घातल्यानंतर मचाडो या व्हेनेझुएलातील लोकशाही संघर्षाचं प्रतीक बनल्या. त्यांचं नाव आता जागतिक शांततेच्या इतिहासात कोरलं गेलं आहे.
सौजन्य बीबीसी