मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचं राजकारण पुन्हा तापलं असतानाच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असून, हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. मात्र या निर्णयाला ओबीसी समाजातून कडाडून विरोध सुरू आहे. ओबीसी समाजाची ठाम भूमिका आहे की, “मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; पण आमच्या कोट्यातील जागांवर गदा आणू नका.” तर दुसरीकडे, मराठा समाजातील काही घटक ओबीसी आरक्षणातूनच लाभ मिळावा, अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंचं विधान विशेष ठरलं आहे.
“फडणवीसांनी कधीच असं म्हटलं नाही…”
“मी स्वतः मराठा समाज उपसमितीमध्ये होतो. अनेक बैठकांना मी उपस्थित होतो. मात्र एकदाही देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओबीसींचं आरक्षण काढून मराठ्यांना द्या’ असं सांगितलं नाही. फडणवीस हे केवळ भाजपचेच नव्हे, तर मराठा समाजाचेही नेते आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असल्यामुळेच वंचित घटकाला न्याय मिळत आहे. प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस,” असं शिवेंद्रराजे म्हणाले.
तसंच, “आजवर ओबीसी आणि मराठा समाजाला वापरण्याचं काम काँग्रेसने केलं आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
गेवराईत पुन्हा तापणार वातावरण?
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात नव्या घडामोडींमुळे तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी नुकतेच “चलो मुंबई” अशा मजकुराचे बॅनर लावून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. त्यावरून पंडित आणि आमदार लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद रंगला.
आता पुन्हा एकदा पंडित यांनी गेवराईत नवे बॅनर लावले आहेत. “मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय, सरकारचे आभार,” असा मजकूर या बॅनरवर आहे. या बॅनरची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून, योगायोगाने हाके आज गेवराई दौऱ्यावर असल्याने स्थानिक वातावरण अधिकच तापण्याची चिन्हं आहेत.


