
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या श्रद्धेचा अधिपती असलेला लालबागचा राजा यंदा विसर्जनावेळी समुद्रात अडकून पडल्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल सहा-साडेसहा तासांपासून मूर्ती गिरगाव चौपाटीवर पाण्यातच थांबलेली असून, विशेष तयार केलेला हायड्रॉलिक तराफा निष्फळ ठरल्याने विसर्जनाची प्रक्रिया पुढे सरकत नाही.
याबाबत कोळी बांधवांनी थेट मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. विसर्जनासाठी आतापर्यंत गिरगावच्या वाडकर बंधूंवर जबाबदारी सोपवली जात होती. मात्र, यंदा लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट गुजरातमधील खासगी तराफा व्यवस्थापकांकडे दिलं. परिणामी विसर्जनात अडथळे निर्माण झाले असल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे.
गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं,
“आम्ही वाडकर बंधू पिढ्यान्पिढ्या लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो आहोत. समुद्राच्या भरती-ओहोटीचा अनुभव आमच्याकडे आहे. पण यंदा आमच्या ऐवजी गुजरातचा तराफा आणून मंडळाने त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली. त्यातूनच ही परिस्थिती उद्भवली आहे. यापुढे मंडळाने विसर्जनाची योग्य काळजी घ्यावी,” अशी टीका त्यांनी केली.
लालबागचा राजाचं विसर्जन नेहमीच लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतं. मात्र, यंदा तराफा आणि समुद्राच्या परिस्थितीमुळे झालेला विलंब भाविकांच्या नाराजीचं कारण ठरत आहे.