
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांचा लाडका ‘लालबागचा राजा’ तब्बल ३३ तासांच्या प्रवासानंतर रविवारी रात्री अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जित करण्यात आला. यंदा विसर्जनासाठी गुजरातहून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्याचे गणित चुकल्याने राजाला तब्बल १३ तास चौपाटीवर थांबावे लागले.
शनिवारी सकाळी दहा वाजता मंडपातून बाहेर पडलेला राजा, लाखो भाविकांच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात करून मार्गस्थ झाला. तरुणाईचा उत्साह, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि ठिकठिकाणी केलेले स्वागत अशा जल्लोषी वातावरणात ही मिरवणूक पुढे सरकत होती. मात्र, रात्री मुंबईवर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मिरवणुकीचा वेग मंदावला. दरवर्षी रविवारी पहाटेच चौपाटीवर पोहोचणारा राजा यंदा सकाळी साडेआठच्या सुमारास तेथे दाखल झाला.
यानंतर राजाला अत्याधुनिक तराफ्यावर विराजमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण हा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात फसला. समुद्रातील भरती-ओहोटीच्या वेळेचे अचूक गणित जुळवण्यात त्रुटी झाल्याने विसर्जन रखडले. दुपारी समुद्र ओहोटीला गेल्यामुळे प्रयत्न थांबवावे लागले. अखेर रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हायड्रॉलिकच्या सहाय्याने राजाला तराफ्यावर आरूढ करण्यात यश आले आणि खोल समुद्रात नेऊन विसर्जन पार पडले. त्याआधी चौपाटीवर भाविकांनी पारंपरिक आरती केली आणि ‘राजा’ला अश्रुपूर्ण निरोप दिला.
कोट्यवधी रुपयांचा तराफा
गुजरातहून आणलेला हा अत्याधुनिक तराफा कोट्यवधी रुपयांचा असून, हायड्रॉलिक लिफ्ट, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, समुद्रातील प्रवाहानुसार स्थिर राहण्याची क्षमता, तसेच ३६० अंशांमध्ये पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत. मात्र, प्रत्यक्ष विसर्जनावेळी समुद्राच्या भरती-ओहोटीचा हिशेब चुकल्याने तराफ्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला.
मंडळाची दिलगिरी
“राजाचे विसर्जन रखडल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजाच्या’ विसर्जनात पोलीस, महापालिका, माध्यमे आणि कोळी बांधवांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” अशी प्रतिक्रिया मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. कोळी बांधव गेल्या २४ वर्षांपासून विसर्जनात सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाडकर बंधूंची नाराजी
“आम्ही वाडकर बंधू वर्षानुवर्षे राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिले. या तराफ्यामुळेच विसर्जन रखडले. दोन बोटींच्या साहाय्याने राजाला समुद्रात नेण्याची पारंपरिक पद्धत अधिक सक्षम होती,” अशी नाराजी नाखवा हिरालाल वाडकर यांनी व्यक्त केली.