
नागपूर प्रतिनिधी
“सॉरी बाबा, मला जमलं नाही…” एवढंच लिहून एका तरुणाने जगाचा निरोप घेतला. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या हिमांशु कश्यप (२४) या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या प्रचंड ताणाला कंटाळून शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉस्टेलमधील खोलीत त्याचा मृतदेह आढळताच कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली.
हिमांशु हा कॉलेज कॅम्पस परिसरातील वसतिगृहात राहत होता. शनिवारी सकाळी त्याचा चौथा पेपर होता. मात्र तो उठलाच नाही. मित्रांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली. “माझ्याकडून झालं नाही, मला माफ करा बाबा,” असे शब्द वाचून सर्वांचे डोळे पाणावले.
कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशु मागील वर्षी (२०२४) पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अपयशी ठरला होता. यंदा त्याने पुन्हा परीक्षा दिली. पहिले तीन पेपर त्याने पूर्ण केले, पण चौथ्या पेपराच्या दिवशी त्याने परीक्षा केंद्रावर न जाता मृत्यूची वाट निवडली.
या घटनेने विद्यार्थ्यांच्या मनातील ताण, दबाव आणि स्पर्धेचे दडपण पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. पालकांच्या अपेक्षा, डॉक्टर होण्याचं स्वप्न आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हरवलेला हा संघर्ष शेवटी हिमांशुला जीवावर बेतला.
पोलीस तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसवर शोककळा पसरली आहे. हॉस्टेलमधील सुमारे १५० विद्यार्थी हादरले असून, सर्वत्र मानसिक ताणावरील चर्चेला उधाण आले आहे.