
नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालासह शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून कट ऑफ गुणांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे अनेक उमेदवारांची आशा धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
ही मुख्य परीक्षा २९ जून २०२५ रोजी घेण्यात आली होती. दोन पेपरांचा समावेश असलेल्या या परीक्षेतून शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नावे, सीट नंबर आणि श्रेणीनिहाय कट ऑफ गुण आयोगाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.
आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच एमपीएससीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची पात्रता निकषांनुसार पडताळणी होणार असून कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोगाकडे असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुण पडताळणीसाठी इच्छुक उमेदवारांना निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच यावेळी शारीरिक चाचणीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यासंदर्भातील माहिती पुढील काही दिवसांत प्रसिद्ध केली जाणार आहे.
पीएसआय कट ऑफमध्ये चांगलीच वाढ
यंदाच्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विविध सामाजिक गटांनुसार व उपगटांनुसार कट ऑफ गुण वाढलेले दिसून आले आहेत.
* खुला प्रवर्ग (मुले) : २९२.५० गुण
* खुला प्रवर्ग (मुली) : २७५.५० गुण
* ओबीसी (मुले) : २७६ गुण
* ओबीसी (मुली) : २५५.५० गुण
इतर प्रवर्गांचे गुणही आयोगाने संकेतस्थळावर तक्त्याच्या स्वरूपात जाहीर केले आहेत. कट ऑफमधील वाढ लक्षात घेता उमेदवारांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.