
नागपूर प्रतिनिधी
गणेशोत्सवाची धामधूम संपताच राज्यभरात मटण-चिकनच्या दुकानांबाहेर अक्षरशः रेकॉर्ड तोड गर्दी दिसून आली. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी रविवार आल्याने खवय्यांचा उत्साह द्विगुणित झाला. परिणामी शहरातील प्रमुख भागांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली. दोन ते तीन तास प्रतीक्षा करूनच नागरिकांना मटण-चिकन मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
नागपूरमध्ये मटणाचा भाव तब्बल ८८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला असून चिकनचे दरही वाढले आहेत. विशेष म्हणजे, मागणी एवढी वाढली की काही दुकानांवर दुपारी एकच्या सुमारासही शेकडो जण रांगेत उभे होते. खामला परिसरातील नामांकित दुकानांसमोर तसेच महाल पूर्व स्टेशनजवळील जय भवानी मटण या दुकानावर प्रचंड गर्दी उसळली.
गर्दीची प्रमुख कारणे
शाकाहारानंतरची मांसाहाराची सुरुवात: गणपती उत्सव काळात अनेकांनी शाकाहार पाळला होता. उत्सव संपताच मांसाहार करण्यास सुरुवात करण्याची परंपरा असल्याने दुकानांवर रांग वाढली.
रविवारचा सोनेरी योग: अनंत चतुर्थी नंतर लगेच रविवार आल्याने सुट्टीच्या दिवशी कुटुंबीयांसह मांसाहाराचा बेत अनेकांनी आखला.
सणानंतरचा उत्साह: दीर्घकाळ संयम पाळल्यानंतर आवडते पदार्थ खाण्याची संधी मिळाल्याने खवय्यांनी दुकानांवर तुफान गर्दी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानंतरची हीच परिस्थिती असल्याचे दुकानदार सांगत होते. “सकाळपासूनच ग्राहकांनी दुकान गच्च भरून टाकले. दोन-तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, एवढ्या दिवसांनी मांसाहार सुरू करण्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो,” असे एका मटण विक्रेत्याने सांगितले.